(Pakistan Heavy Rainfall) पाकिस्तानात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे देशात भीषण हानी झाली असून, आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तब्बल 140 लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
या नैसर्गिक आपत्तीत 715 नागरिक जखमी झाले असून, मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे 1,676 घरे बाधित झाली असून त्यापैकी 562 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. पावसामुळे जनावरांवरही परिणाम झाला असून, 428 पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक भागात भूस्खलन, विजेचा धक्का आणि इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. सरकारी यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून, आतापर्यंत जवळपास 2,880 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
नागरिकांना मदत म्हणून 1,999 तंबू, 958 उबदार चादरी, 569 रजया, 1,163 अन्नाचे पाकिटे, 1,122 स्वच्छता किट्स, 1,282 स्वयंपाक साहित्याचे संच, 2,170 प्लास्टिकच्या पत्र्या आणि 146 पाणी उपसण्यासाठी पंप इत्यादी वस्तू वितरित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील इशारा दिला आहे की 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान देशाच्या उत्तर भागात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.