पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने "ऑपरेशन सिंदूर"च्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे. यानंतर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, भारताशी झालेल्या लष्करी संघर्षानंतर चीनने पाकिस्तानला गुप्त माहितीच्या माध्यमातून मदत केली आहे.
चीनकडून भारतासंदर्भातील सॅटेलाईट आणि अन्य माध्यमांतून मिळालेली माहिती पाकिस्तानसोबत शेअर केली गेल्याची कबुली त्यांनी दिली आहे. "मित्र राष्ट्रांमध्ये गुप्त माहितीची देवाणघेवाण करणे हे आता सामान्य झाले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, "आम्हीही चीनसोबत अशा प्रकारची माहिती शेअर करतो आणि त्यात काहीच अनपेक्षित नाही," असे ते म्हणाले. ख्वाजा आसिफ यांच्या म्हणण्यानुसार, भारताशी तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानने पूर्ण सतर्कतेची भूमिका घेतली आहे.
“संघर्षानंतर इस्लामाबाद सतत अलर्टवर आहे आणि आम्ही कोणतीही ढिलाई दाखवलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. एक महिन्यांहून अधिक काळ पाकिस्तानने उच्च पातळीवर सज्जता कायम ठेवली असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 7 ते 10 मे दरम्यान लष्करी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर युद्धविराम झाला असला तरी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. यामध्ये चीनकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे स्पष्ट होते.