थोडक्यात
इस्रायलच्या जेरुसलेममध्ये बसथांब्यावर गोळीबार
गोळीबारात 5 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
हल्लेखोरांनी बसथांब्यावरील नागरिकांवर झाडल्या गोळ्या
जेरुसलेममध्ये सोमवारी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने भीतीचं सावट निर्माण झालं आहे. रामोट जंक्शन परिसरातील बसस्टॉपवर दोन पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी नागरिकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत.
रुग्णवाहिका सेवेनं दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 50 वर्षीय पुरुष, पन्नाशीतील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं.
इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्लेखोर हे वेस्ट बँकेतील रहिवासी होते. घटनानंतर इस्रायलच्या लष्करी दलाने त्या भागात बंदोबस्त वाढवून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच एका संशयिताला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून बंदुका, दारूगोळा आणि चाकू जप्त करण्यात आला आहे.
या हल्ल्याचा निषेध अनेक देशांनी केला असून इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी याला "निरपराध नागरिकांवरचा निर्दयी हल्ला" असे संबोधले. पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी देखील सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचा विरोध दर्शवला.