थोडक्यात
अमेरिकेतील मिशिगनमधील चर्चमध्ये गोळीबार
गोळीबारानंतर निर्माण झालेल्या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक
या घटनेत अनेक लोक जखमी
(Michigan Church Firing) मिशिगन राज्यातील ग्रँड ब्लँक टाउनशिप येथे रविवारी सकाळी उपासनेदरम्यान भीषण गोळीबार झाला. चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स (एलडीएस) या प्रार्थनास्थळी एका हल्लेखोराने वाहन दरवाज्यावर आदळवून आत प्रवेश केला आणि अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर चर्चला आग लावली. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संशयिताला ठार करण्यात आले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेकडो लोक चर्चमध्ये उपस्थित होते. गोळीबारानंतर निर्माण झालेल्या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर नसली तरी काही मुलेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळील हेन्री फोर्ड जेनेसिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे, तर इतर सात जण स्थिर आहेत.
एफबीआयचे प्रमुख काश पटेल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रार्थनास्थळी होणारा कोणताही हिंसाचार हा भ्याड आणि गुन्हेगारी प्रकार आहे. घटनास्थळी स्थानिक पोलिसांना मदत करत आहेत. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत.” तपासकर्त्यांच्या माहितीनुसार हल्लेखोराने चर्चमध्ये पेट्रोलसारखे ज्वलनशील द्रव्य वापरून आग लावली.
या घटनेतून अमेरिकेत पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, याच आठवड्याच्या शेवटी उत्तर कॅरोलिनातील साउथपोर्ट येथेही एका रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाला होता. त्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी एका ४० वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
दरम्यान, मिशिगनमधील हल्ल्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, स्थानिक पोलिस आणि फेडरल एजन्सींचे पथक तपास सुरू ठेवून आहेत.