लवकरच दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे आता सगळेच दहावी बारावीतील विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. पण आता विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करावा लागणार आहे. तसेच या परीक्षांमद्धे कोणतेही गैरप्रकार करा येणार नाहीत. असे केल्यास विद्यार्थ्यांना ते महाग पडू शकते. असे होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत.
बोर्डाच्या परीक्षेत गैरप्रकार करताना आढळल्यास दखलपात्र व अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचप्रकारे कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांना व मदत करणाऱ्यांवर देखील थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षेला यावर्षी 31 लाख विद्यार्थी बसणार आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी 14 लाख 94 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तसेच दहावीसाठी 16 लाख 7 हजार विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेसाठी एक लाख 80 हजारपेक्षा अधिक लोक कार्यरत असणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर त्यासाठी समुपदेशकही नेमण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी काही अडचणीमध्ये असतील तर समुपदेशकांची मदत घेऊ शकतील. मात्र जर विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येऊ शकतील असेही शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
याबद्दल विद्यार्थ्यांसाठी नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, कॉपी करणारे विद्यार्थी व कॉपी करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण असेल तर त्यांनी समुपदेशकाची मदत घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.