देश-विदेश

"पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार...", सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मागणी

या पत्राद्वारे त्यांनी या कुटुंबांतील एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचीही विनंती केली आहे.

Published by : Shamal Sawant

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिक मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. या अमानुष कृत्याचा देशभरातून तीव्र निषेध होत असून, भारतीयत्वाच्या रक्षणासाठी देशातील नागरिक एकवटले आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, शहीद नागरिकांच्या कुटुंबीयांना येत्या 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. तसेच या पत्राद्वारे त्यांनी या कुटुंबांतील एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचीही विनंती केली आहे.

पहलगाम येथे झालेल्या या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने, पनवेलचे दिलीप डिसले आणि पुण्याचे कौस्तुभ गनबोटे व संतोष जगदाळे यांचा समावेश आहे. अतिरेक्यांनी निर्दयतेने केलेल्या हल्ल्यामुळे या नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेली धैर्याची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

पत्रात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आपले जिवलग व्यक्ती डोळ्यांदेखत गमावत असतानाही या कुटुंबीयांनी जे धैर्य दाखवले ते अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या धैर्याचा सन्मान करण्यासाठीच 'नागरी शौर्य' पुरस्कार देणे उचित ठरेल.

सुप्रिया सुळे यांनी पत्रात स्व. संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी या उच्चशिक्षित असल्याचे नमूद करून, त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याची विशेष मागणी केली आहे. या कृतीतून महाराष्ट्र शासनाने या कुटुंबीयांना आधार द्यावा आणि महाराष्ट्रातील जनता त्यांच्या सोबत आहे, याचा विश्वास त्यांना द्यावा, असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासन या संवेदनशील विनंतीचा सकारात्मक विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा