टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता आणि पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलचा मानद पदक प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या अधिकृत कायदेशीर कागदपत्रांनुसार आणि 'द गॅझेट ऑफ इंडिया' या साप्ताहिक सार्वजनिक पत्रिकानुसार ही नियुक्ती 16 एप्रिलपासून लागू झाली. याआधी नीरज भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होता. देशातील अव्वल खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी एक उपक्रम मानला जाणारा टेरिटोरियल आर्मी अंतर्गत त्याला ही बढती देण्यात आली आहे.
2020 साली टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदकाची कमाई केली होती. दरम्यान नीरज याआधी म्हणजे 2016 साली ज्युनियर कामिशन ऑफिसर म्हणून नायाब सुभेदार रॅंकसह आर्मीमध्ये भरती झाला होता. 2021 साली त्याला सुभेदार पदावर असताना उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले. 2022 साली भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च शांतताकालीन पदक, परम विशिष्ट सेवा पदक, प्रदान केल्यानंतर त्याला सुभेदार मेजर पदावर बढती देण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील प्रादेशिक सैन्यात आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलनंतर भारतीय सैन्याकडून चांगला पगार मिळेल. भारतीय संरक्षण अकादमीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलला 1,21,200 रुपये ते 2,12,400 रुपये पगार मिळतो. भारतीय सैन्याची ही वेतन रचना 7 व्या वेतन आयोगावर आधारित आहे.
लेफ्टनंट कर्नल होण्यापूर्वी नीरज चोप्राची एकूण संपत्ती 37 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. नीरज चोप्रा यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे 4 कोटी रुपये आहे. नीरज चोप्रा आंतरराष्ट्रीय खेळांमधून तसेच जाहिरातींमधून भरपूर पैसे कमवतो. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला अनेक उत्पादनांचे ब्रँड अॅम्बेसेडरही बनवण्यात आले आहे.