ओडिसामध्ये पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना घडली आहे. बंगळुरू ते आसामच्या दरम्यान धावणारी कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून खाली घसरले आहेत. या सगळ्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन कटक ओडिशातील चौद्वारजवळ रुळावरून घसरली. ट्रेनचे 11 एसी डबे रुळावरून घसरले, त्यानंतर नीलाचल एक्सप्रेस, धौली एक्सप्रेस, पुरुलिया एक्सप्रेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या स्थळी सुखरूप पोहोचता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कामाख्या एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, 'मला ओडिशातील 12551 कामाख्या एक्स्प्रेसशी संबंधित घटनेची माहिती मिळाली आहे. आसामचे सीएमओ ओडिशा सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहेत. आम्ही सर्व बाधित लोकांशी संपर्क करू".