हुंडा घेणं गुन्हा असला तरीही देशात आजही अनेक ठिकाणी हुंडा घेतला जातो. हुंडा न मिळाल्याने अनेकदा विवाहितेचा छळदेखील केला जातो. अशातच आता हुंडा छळाप्रकरणी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हुंडा न मिळाल्याच्या रागात सासरच्या लोकांनी महिलेला एचआयव्ही बाधित सुई टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबद्दल आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उत्तर प्रदेश येथील सहारणपूरचे एसपी सागर जैन यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "पीडित महिला ही सहरणपूरची आहे. आम्ही तिचा नवरा, दीर, नणंद व सासू यांच्याविरोधात आयपीसी कलम 307,498 ए, 323, 328, 406 आणि हुंड्यासंबंधी इतर कलमांच्या आधारे गंगोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घडल्या प्रकाराबद्दल पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.
पीडितेचे वडील म्हणाले की, फेब्रुवारी 2023 मध्ये मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी 45 लाख रुपये खर्च केला. आम्ही अलिशान गाडी आणि 15 लाख रुपये रक्कम दिली. पण ते अजून 10 लाख आणि मोठ्या गाडीची मागणी करत होते. त्यामुळे पीडितेच्या सासरच्यांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. हुंडा न दिल्यास मुलांचे दुसरं लग्न लाऊन देण्याची धमकी दिली. तिला घरातून बाहेर काढण्यात आले. तसेच नंतर पुन्हा घरी गेल्यानंतर शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली". सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत नसल्याचेही पीडितेच्या वडिलांनी सांगितले आहे.