माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याची अधिकृत घोषणा त्यांच्या कार्यालयाने रविवारी केली. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरात प्रथम एक छोटी गाठ आढळून आली होती, जी नंतर कॅन्सरमध्ये रूपांतरित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
बायडन यांचा कॅन्सर अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याचा ग्लेसन स्कोअर ९ (ग्रेड ग्रुप ५) असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारचा कॅन्सर आक्रमक असून तो सध्या हाडांपर्यंत पसरलेला आहे. वैद्यकीय भाषेत याला मेटास्टेसिस म्हणतात. तथापि, हा कॅन्सर हार्मोन-संवेदनशील असल्याने उपचार प्रभावी ठरू शकतात. बायडन यांचे कुटुंब सध्या विविध उपचार पर्यायांवर विचार करत आहे.
या वृत्तानंतर अमेरिकेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बायडन यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले की, “मिशेल आणि मी जो व त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहोत.” डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मेलानिया आणि मी त्यांना लवकर व यशस्वी उपचारांसाठी शुभेच्छा देतो.”
भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस म्हणाल्या की, “जो बायडन हे खरे योद्धा आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक संकटांवर मात केली आहे आणि यावरही करतील.”
हिलरी क्लिंटन व परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीदेखील बायडन यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबासाठी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.