मनोरंजन

इतिहासात दडलेली 'राव' अन् 'रंभा'ची अनोखी प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर

Published by : Team Lokshahi

प्रणव ढमाले

आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या शिलेदारांवर आधारित अनेक चित्रपट आपण पहिले आहेत. मात्र शिवरायांच्या इतिहासात देखील एक प्रेम कहाणी दडल्याचे क्वचितच लोकांना माहिती असेल. स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा आणि शिवरायांसह सरनोबात प्रतापराव गुजर यांच्यावर अतोनात श्रद्धा असणारा एक रांगडा मावळा म्हणजे 'रावजी'. तर रावजीच्या प्रेमाखातर रायगडाचे टकमक टोक आपल्या हातावर गोंदणारी 'रंभा'. या दोघांची प्रेम कहाणी उलगडणारा 'रावरंभा' चित्रपट

शिवरायांच्या मावळ्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी प्रत्येक मावळ्याने इतिहासात अमर होईल असे योगदान दिलंय. शिवाय हे योगदान देत असताना त्यांनी केलेला त्यागही न विसरण्यासारखा आहे. अशाच त्यागावर आधारलेली आणि इतिहासात दडलेली प्रेमकथा उलगडणारा चित्रपट म्हणजे 'रावरंभा'. शिवरायांसाठी आपला जीव ओवाळून टाकणाऱ्या सरनौबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या मावळ्यांची ही कहाणी. स्वराज्याची सेवा करण्यासाठी एका छोट्याशा गावातून एक मावळा येतो.. त्यानंतर तो आपल्या प्रेमाचा त्याग करत स्वराज्यासाठी बलिदान देतो अशा एका वीर झुंजार मावळ्याची ही कहाणी. या मावळ्याचं नाव रावजी आणि त्याच्यावर आतोनात प्रेम करणारी रंभा यांची अनोखी प्रेमकहाणी आणि ही पुर्ण होत असताना त्यांच्या विरोधात उभा असणारा जालिंदर आणि खुद्द आदिलशाही सरदार. यांची एक इतिहासात दडलेली गोष्ट चित्रपटातून उलगडली आहे.

सिनेमातील प्रमुख भुमिकांबाबत बोलायचं झाल्यास. एकंदरीत रावजीची भुमिका साकारणारा ओम भुतकर संपूर्ण सिनेमात अतिशय शांत/संयमी आणि कुठेही अतिउत्साह न दाखवता अभिनयाचा तराजू तोलवत ठेवतो. तर दुसरीकडे रंभा साकारणारी मोनालिसा बागल अभिनयाचा चांगला प्रयत्न करताना दिसते. एकीकडे स्वराज्य रक्षक संभाजी सारख्या मालिकेत खुद्द अमोल कोल्हेंसमोर शंतनू मोघेंनी साकारलेली शिवरायांची भुमिका आपल्याला मंत्रमुग्ध करते. त्याचप्रमाणे या सिनेमात सुद्धा मोघेंनी शिवराय साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. दुसरीकडे मात्र, कुशल बद्रिके आणि संतोष जुवेकर यांनी साकारलेल्या खलनायकरांच्या भुमिका चित्रपटाची एक बाजू उचलून धरतात. शिवाय किरण माने आणि अपूर्वा नेमळेकरांची छोटीशी भुमिका मन जिंकून जाते. चित्रपट संपल्यानंतर काही प्रमुख भुमिकांऐवजी किरण माने आणि अपूर्वा नेमळेकरांची भुमिका लक्षात राहते.

इतक्या तगड्या कलाकारांची फौज असूनही चित्रपट बघत असताना चित्रपटावर अजून काम करण्याची गरज जाणवत राहते. चित्रपटाचे संगीत उत्तम दर्जाचे आहे. गीतांचे बोल देखील उत्तम दर्जाचे आहेत. मात्र, सिनेमा बघत असताना त्यावेळी या गाण्यांची खरंच गरज होती का? असा प्रश्न पडतो. सरते शेवटी प्रत्येकाच्या तोंडात केवळ 'एक रंभा, एक राव, दोन जीव, एक नाव' याच ओळी राहतात. बाकी गाण्यांचा प्रभाव फारसा जाणवत नाही. चित्रपटाचे छायांकन खुद्वद संजय जाधवांनी केलंय. त्यामुळे त्यात एक वेगळेपण आहे. मात्र चित्रपटात वापरलेले व्हीएफएक्स चित्रपटाची मजा द्विगुणित करण्याऐवजी कमी करत असल्याचे जाणवते.

एकंदरित सांगायचे झाल्यास चित्रपटातील कलाकार उत्तम दर्जाचे आहेत. मात्र, दिग्दर्शकाचा ऐतिहासिक चित्रपट निर्मितीतील अपुरा अनुभव मोठ्या पडद्यावर साफ दिसतो. आणि हाच अनुभव प्रेक्षकांच्या मनात विशेष घर निर्माण करण्यात अपयशी ठरतो. इतिहासात न उलगडलेली प्रेम कहाणी पाहण्यासाठी आणि छत्रपतची शिवाजी महाराजांच्या इतिहासातील क्षण मोठ्या पडद्यावर थिएटरमधील साऊंड इफेक्ट्ससह अनुभवण्यासाठी आणि केवळ एक इतिहासाची आवड असणारा आणि शिवरायांप्रती आवड असणारा मावळा म्हणून चित्रपट पाहायला हरकत नाही.

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."