मराठी सिनेसृष्टीतील 'भाऊजी' म्हणून घरांघरात पोहचलेले लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे आदेश बांदेकर सध्या खाजगी कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या खोट्या, धक्कादायक बातम्यांमुळे त्यांनी थेट संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. अचानक त्यांच्या निधनाच्या बातम्या फिरू लागल्या. काही जण तर श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं दिसलं! हे सगळं पाहून आदेश बांदेकर यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रकृती व्यवस्थित असल्याचं स्पष्ट केलं आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांना जोरदार सुनावले.
व्हि़डिओमध्ये आदेश बांदेकर म्हणतात की, "फक्त माझ्यापुरतं असतं तर गप्प बसलो असतो. प्रेमाने आणि काळजीने अनेकांचे फोन आले, पण जेव्हा असत्य बातम्यांचा पाढा वाचायला लागलो. मृत्यू, अपघात, श्रद्धांजली तेव्हा वाटलं की ही फक्त अफवा नाही. ही एक मानसिक विकृती आहे. आज मी आहे, उद्या कुणी दुसरा कलाकार याचा बळी ठरू शकतो. व्ह्यूजसाठी माणसांचे मृत्यूच्या बातम्या विकल्या आहेत. या प्रकारांना थांबवायचं असेल तर यामागची वृत्ती बदलावी लागेल. चार व्ह्यूजसाठी थोड्या प्रसिद्धी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे. ही वृत्ती समाजासाठी घातक आहे. म्हणूनच मी या विकृतीला श्रद्धांजली अर्पण करतो!"
पुढे आदेश बांदेकर म्हणाले की, "मी पूर्णपणे ठणठणीत आणि सक्रिय आहे. मी सुदृढ आहे, कामाच्या प्रवासात आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी कार्यरत राहणार आहे. काळजी करणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार!" या स्पष्ट, ठाम आणि भावनिक अपीलमुळे अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही एकत्र येत अशा खोट्या वृत्तीविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. खोट्या बातम्यांचा हा बाजार थांबवण्यासाठी हीच वेळ आहे",असे आदेश बांदेकरांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.