बहार-ए-उर्दू येथे उर्दू साहित्य अकादमीची 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमासाठी मनोरंजन क्षेत्रातील काही नामवंत कलाकार, कवी तसेच राजकीय नेत्यांनी आपली उस्थिती लावली होती. या कार्यक्रमात माणिकराव कोकाटे, जावेद अख्तर, सचिन पिळगावकर, शेखर सुमन, अली असगर हे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात बोलताना सचिन पिळगावकर यांचा नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात त्यांनी म्हटलं होत की, "माझी मातृभाषा मराठी आहे. पण मी विचार उर्दू भाषेमध्ये करतो." त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. असं असताना हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक जावेद अख्तर यांनी देखील मुंबई आणि महाराष्ट्राचं उर्दूसोबत असणारं नात मांडलं आहे.
यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, "विसाव्या शतकामध्ये सुद्धा उर्दुतील बहुसंख्य ज्येष्ठ लेखक अन् कवी मुंबईतील आहेत. उर्दूचे सगळेच साहित्यकार मुंबईतील आहेत, हे अविश्वसनीय आहे. त्यांच्यातलं कोणी सिनेविश्वात काम करत होते, काही इतर काम करत होते. महाराष्ट्र आणि मुंबई यांच उर्दू लेखक आणि कवी यांच्यासोबतचं नात अतिशय घट्ट आहे. "
तसेच पुढे न्यायमूर्ती गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना जावेद अख्तर म्हणाले की," अशा वेळी हे विषय काढू नका, चांगल्यावेळी असे विषय का काढायचे? चांगला कार्यक्रम होत आहे, त्याचं कौतुक करू या. खिरीमध्ये मीठ टाकायची काय गरज आहे? असं म्हणत जावेद अख्तर यांनी आपलं मत मांडलं.