आयकॉन स्टार अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया कलाकारांपैकी एक ठरले आहेत. दमदार अभिनय, वेगळा स्टाइल आणि करिष्म्यामुळे त्यांनी भारतातच नव्हे तर जगभरात प्रचंड चाहतावर्ग मिळवला आहे. आता त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा 2: द रूल’ जपानमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
जगभर ओळखला जाणारा ‘पुष्पा’ हा पात्र आणि बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करणारा हा चित्रपट जपानमध्ये ‘पुष्पा कुनरिन’ या नावाने १६ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी अल्लू अर्जुन टोकियोत दाखल झाले. त्यांच्यासोबत पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी, मुलगा अल्लू अयान आणि मुलगी अल्लू अरहा देखील होते.
टोकियोत पोहोचताच जपानी चाहत्यांनी अल्लू अर्जुन यांचे जल्लोषात स्वागत केले. मोठ्या संख्येने चाहत्यांनी चित्रपटांचे पोस्टर्स आणि फुलांचे गुच्छ घेऊन हजेरी लावली होती. अल्लू अर्जुन यांनीही मनमोकळेपणाने चाहत्यांशी संवाद साधला, त्यांचे प्रेम स्वीकारले आणि हा क्षण खास बनवला. त्यांच्या आगमनाचा व्हिडिओ चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गीक पिक्चर्स आणि शोचिकु डिस्ट्रीब्यूटर्स यांनी मिथ्री मूव्ही मेकर्स आणि सुकुमार रायटिंग्स यांच्यासोबत मिळून ‘पुष्पा’ला जपानमधील चित्रपटगृहांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. हा चित्रपट जपानमध्ये सुमारे २५० स्क्रीन्सवर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. जपानी प्रेक्षकांचा भारतीय चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, ‘पुष्पा 2: द रूल’ तिथेही प्रेक्षकांची मने जिंकेल, असा निर्मात्यांचा विश्वास आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ने अल्लू अर्जुनसाठी नवे विक्रम रचले आहेत. चित्रपटाने हिंदीमध्ये ₹800 कोटी आणि जागतिक स्तरावर सुमारे ₹1800 कोटींची कमाई केली आहे. पुढील प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास, अल्लू अर्जुन दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत एका नव्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटावर काम करत आहेत, ज्याचे तात्पुरते नाव AA22XA6 आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत दीपिका पादुकोणही झळकणार आहे.