पावसाच्या सरींसह संगीताचा साज चढवणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे ‘जो सावन आया है’ यंदाच्या पावसाळ्यात रसिकांच्या भेटीला आले असून, त्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता यांनी आपल्या संगीतमय प्रवासात आणखी एक मोहक अध्याय जोडला आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सावन’ गाण्याच्या विस्तारित आवृत्तीने यंदाच्या हंगामात भावनांचा पूर आणला आहे. हे गाणे केवळ संगीताची झिंग देणारे नाही, तर त्यातून पावसाच्या थेंबांत मिसळलेली हळवी भावना, विरह आणि सौंदर्य यांची गोड अनुभूती मिळते. “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने बरसना सिखाया है,” या ओळी अमृता यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केल्या असून, त्यांना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘सावन’ या गाण्याची मूळ आवृत्ती मागील वर्षी प्रदर्शित झाली होती.
त्याच्या गाण्याचे बोल, संगीत, दृश्यमानता आणि अमृता यांचा भावस्पर्शी आवाज यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. यंदाच्या विस्तारित आवृत्तीत अधिक गहिरा भावनिक पोत आढळतो. गाण्यातील दृश्यरचना आणि अमृता यांचा आत्मीय गायनशैली यामुळे ‘सावन’ पुन्हा एकदा संगीतप्रेमींच्या ओठांवर आले आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांचे ‘मारो देव बापू सेवालाल’ हे पारंपरिक शैलीतील गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात त्यांनी बंजारनची भूमिका साकारली होती आणि त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली होती. गाण्यातील पारंपरिक बंजारा वेशभूषा, नृत्य, आणि संगीतातील लोकसंगीताचा बाज यामुळे हे गाणे विशेष ठरले होते.
विशेष म्हणजे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांनीही या गाण्याचे कौतुक करत सोशल मीडियावर त्याची पोस्ट शेअर केली होती. सलमान खानचा असा पाठिंबा मिळणे ही अमृता यांच्या संगीत प्रवासातील एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. या पाठिंब्यामुळे ‘मारो देव बापू सेवालाल’ गाणे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिले. या गाण्यातून त्यांनी सांस्कृतिक जपणूक व लोकपरंपरेचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. अमृता फडणवीस या केवळ गायिका नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही सक्रिय कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
अनेक सामाजिक उपक्रम, महिलांसाठीचे अभियान, आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या संगीताच्या माध्यमातून त्या सामाजिक संदेशही पोहोचवत असतात. त्यांचे यापूर्वीचे 'भानगड', 'फिर से' आणि 'मुझमे' यांसारखी गाणी देखील रसिकांनी भरभरून ऐकली असून, त्यांचं प्रत्येक नविन प्रोजेक्ट हे चर्चेचा विषय ठरते. ‘सावन’ आणि ‘मारो देव बापू सेवालाल’ या गाण्यांनी त्यांच्या प्रतिभेची नवी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली आहे. सोशल मीडियावर दोन्ही गाण्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.
‘सावन’च्या विस्तारित आवृत्तीने पावसाळ्याच्या निसर्गभावनेला एक नवा सूर दिला आहे, तर ‘मारो देव बापू सेवालाल’ने लोकसंगीताच्या माध्यमातून पारंपरिकतेची आठवण करून दिली आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अशा अनेक माध्यमांवर चाहत्यांनी अमृता यांचे कौतुक करत हजारो प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांच्या संगीतातील हा प्रवास रसिकांना नवनवीन आश्चर्य देत आहे. त्यांच्या आगामी प्रकल्पांकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.