सध्या प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित चंद्रमुखी (Chandramulkhi Poster) हा मराठी चित्रपट 22 एप्रिल रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा तारीख जाहीर करण्याचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. याच कार्यक्रमांमधून चंद्रमुखीची भूमिका अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) करत आहे हे रसिकप्रेक्षकांना कळाले. तर या चित्रपटातून नायकाची भूमिका आदिनाथ कोठारे (Aadinath Kothare) हा करतोय. या सिनेमातील स्टारकास्ट आत्तापर्यंत गुपित ठेवण्यात आली होती. सध्या या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अमृताने आपल्या एका मुलाखतीत नुकताच एक खुलासा केला आहे.
अमृतानं सांगितलं, "माझे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मला आधीच सांगितलं होतं की, मला तू बारीक, झिरो फिगर वगैरे नको आहेस. मी आयुष्यात पहिल्यांदा वजन वाढवलं होतं. जवळपास आठ किलोंनी माझं वजन वाढलं होतं. जेव्हा मी शूटिंग सुरू केलंस तेव्हा मी 60 किलोंची होते. माझं आयुष्यात इतकं वजन कधी वाढलं नव्हतं, मी 50-55 या रेंजमध्ये असायचे. पण माझ्या दिग्दर्शकाची तशी अटच होती की, नऊवारीमध्ये चंद्राचा बांधा सुबक दिसायला हवा. म्हणून हे वजन वाढवलं."
आपल्या भूमिकेचं सार सांगताना अमृताने म्हटलं, "चंद्रा हे पात्र फक्त लावणी सम्राज्ञी नाहीये. ती केवळ नृत्यांगनाही नाहीये. ती प्रेमिका आहे. कृष्णभक्त आहे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये चंद्रा आणि चंद्रमुखीमध्ये प्रत्येक स्त्री आहे. कारण झोकून देऊन स्वतःच्या कलेसाठी काहीतरी करणं, झोकून देऊन प्रेम करणं काय असतं हे स्त्रीलाच जमू शकतं. आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे चंद्रमुखी आहे".