मनोरंजन

अमृता खानविलकर साकारणार 'ललिता शिवाजी बाबर'

जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर.

Published by : Siddhi Naringrekar

जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा 'ललिता शिवाजी बाबर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे एंडेमॅाल शाईनं इंडिया आणि मराठी कॅान्टेन्टला एका वेगळ्या स्तरावर नेणारे प्लॅनेट मराठी एकत्र येत एक जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणार, हे नक्की! ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'ललिता बाबर' यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ''एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिंपिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " साताऱ्यातील एका लहान गावात, शेतकरी कुटुंबात ललिता बाबर यांचा जन्म झाला. ललिता बाबर यांच्या प्रवासाला त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात झाली. त्या रोज शाळेत धावत जात असत आणि तिथूनच त्यांनी आपला धावण्याचा सराव सुरु केला. त्यांच्या या मार्गात अनेक अडथळे आले, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. आज संपूर्ण जगात त्या 'माणदेशी एक्सप्रेस' या नावाने ओळखल्या जातात. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकालाच नवीन ऊर्जा देणारा आहे. म्हणूनच त्यांचा हा स्फूर्तिदायी प्रवास जगभरात पोहोचावा, याकरता एंडेमॉल शाईन इंडिया यांच्या साथीने आम्ही या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. त्यांची आजवरची कारकीर्द पाहता 'ललिता शिवाजी बाबर'चे पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत आहोत.’’

एंडेमॅालचे शाईन इंडियाचे गौरव गोखले म्हणतात, ‘’अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय चित्रपट आम्ही केले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही मराठी प्रादेशिक चित्रपट करत आहोत. प्लॅनेट मराठी हे मराठीतील एक नावाजलेले प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे त्यांच्या सहयोगाने काम करताना आनंद होतोय. आम्हाला हा प्रोजेक्ट एका आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे, जेणे करून जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील. अमृतासारखी गुणी अभिनेत्री ही भूमिका साकारतेय, म्हणजे ‘ललिता शिवाजी बाबर’ला शंभर टक्के न्याय मिळणार, हे नक्की. अमृता मुळात खिलाडू वृत्तीची असल्याने ही भूमिका ती योग्यरित्या साकारेल, याची खात्री आहे.’’

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

Latest Marathi News Update live : राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन