मुंबईतील फिल्मसिटीमध्ये स्टार प्लस शो 'इमली'च्या शूटिंगदरम्यान लाइटमन महेंद्र यादव यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. महेंद्र यादव शूटिंगमध्ये लाईटमन म्हणून काम करायचे आणि त्याचे वय 23 वर्षे असल्याचे सांगितले जाते. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव गोरखपूरला पाठवण्याची तयारी सुरू आहे.
मृत महेंद्र यादव हा 'धडक कामगार युनियन'चा सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजीत राणे म्हणाले, 'या घटनेची माहिती मिळताच आम्ही फिल्मसिटीमध्ये पोहोचलो. मालिकेच्या निर्मात्यांना या घटनेची माहिती देण्यात आली, परंतु कोणीही आले नाही. मयत महेंद्र यादव यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्याची तयारी सुरू आहे.
मालिकांमध्ये काम करणार्या कामगारांच्या सुरक्षेबाबत बोलले जात आहे, पण ना फिल्मसिटी प्रशासन या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करत आहे ना शो आणि चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे अशा काही घटना रोजच घडत असतात. फिल्मसिटीमध्ये अनेक अपघात होत आहेत. कधी आग लागली तर कधी बिबट्याचा हल्ला, विजेचा धक्का लागून कामगारांना जीव गमवावा लागत आहे. अलीकडेच 'गम हैं किसी के प्यार के' या मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली होती.