छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'बिग बॉस मराठी' शोच्या तिसऱ्या पर्वाचा निकाल लागला आहे. यंदाच्या तिसऱ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आता हा निकाल लागला आहे.
बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. विशाल निकम हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
आज (२६ डिसेंबर) संध्याकाळी ७ वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. मिनल शहा ही बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदेंनेही एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. यातील विकास पाटील हा स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर जय आणि विशाल या दोघांमध्ये विशाल निकम हा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.