सोशल मीडिया इंफ्लूइन्सर प्रणित मोरे हा सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'स्काय फोर्स'मधील अभिनेता वीर पहारियाबद्दल प्रणितने विनोद केल्याने तो अडचणीत सापडला आहे. वीर पहारियाबद्दल विनोद करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. यामुळे वीरच्या काही चाहत्यांनी प्रणितवर हल्ला केला आहे. सुरु असलेला कार्यक्रम संपल्यानंतर १०-१२ जणांनी प्रणितवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रणित गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर प्रणितच्या समर्थनार्थ अनेकांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आता खुद्द वीर पहारियाने उडी घेतली आहे.
प्रणित मोरेवर हल्ला झाल्यानंतर अनेकांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता वीरनेदेखील या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, "कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं ते वाचून मला धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ते म्हणजे या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशी सुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही. या घटणेचं समर्थनदेखील करणार नाही".
पुढे त्याने लिहिले की, "माझ्यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन की या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती हे डिझर्व्ह करत नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो.” आता या प्रकरणाला कोणतं वळण लागेल याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
वीरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा हा नातू आहे.