भारतीय चित्रपटसृष्टीत पौराणिकतेचा आणि भयपटाचा संगम घडवणारा चित्रपट ‘माँ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘माँ’ ही एका आईच्या प्रेमाची, तिच्या लढ्याची आणि त्यागाची अनोखी कथा आहे. चित्रपटात काजोल एका शक्तिशाली आईची भूमिका साकारत असून, तिची मुलगी एका पौराणिक अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडते.
चंद्रपूर नावाच्या गावात वसलेल्या आई-मुलीच्या जोडीवर या गावातील एक दैत्यसदृश ताकद संकट आणते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी काजोलचे पात्र नरकयातना सहन करते आणि त्या शक्तींचा सामना करते. भय, रहस्य आणि मायथोलॉजी यांचा सुंदर मिलाफ असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
‘माँ’ हा चित्रपट 27 जून 2025 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोलसोबत रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, शुभंकर, जितीन गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘छोरी’ आणि ‘छोरी २’ फेम विशाल फुरिया यांनी केले आहे. प्रेक्षकांमध्ये या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली असून, ‘माँ’ हा वर्षातील सर्वात चर्चित भयपट ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.