बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झाले. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या घटनेतील धक्कादायक अपडेट समोर आले असून, त्यांच्या मृत्यूला मधमाशी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय कपूर लंडनमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना एका मधमाशी संजयच्या घशात घुसली. ती मधमाशी घशात अडकल्याने त्याला तीव्र जळजळ होऊ लागली. परिणामी त्याला घबराट आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाला. याच तणावामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही माहिती लेखक आणि अभिनेता सुहेल सेठ यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.
संजय कपूरला पोलो खेळाची विशेष आवड होती. तो सोशल मीडियावरही या खेळाचे फोटो नेहमी शेअर करत असे. मात्र खेळाच्या दरम्यान घडलेल्या या विचित्र आणि दुर्दैवी घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. संजयच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, करीना कपूर, सैफ अली खान, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांनी करिष्माच्या घरी जाऊन तिचं सांत्वन केलं.
संजय कपूरने आपल्या मृत्यूपूर्वी काही तास आधी सोशल मीडियावर अहमदाबादमधील एअर इंडिया अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं होतं. “या कठीण काळात देव पीडित कुटुंबांना बळ देईल,” असं त्याने एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर लिहिलं होतं.
त्याच्या मृत्यूनंतर अंदाजे 1.2 अब्ज डॉलर्स (जवळपास 10,000 कोटी रुपये) एवढी प्रचंड संपत्ती मागे राहिली आहे. त्याच्या कुटुंबात तिसरी पत्नी प्रिया सचदेव आणि त्यांचा मुलगा असून, करिष्मा कपूरपासून त्याला दोन मुले – समायरा आणि कियान – आहेत. करिष्माने अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
करिष्मा आणि संजय कपूर – एका ग्लॅमरस नात्याची कहाणी
संजय कपूर आणि करिष्मा कपूर यांचा विवाह 2003 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. दिल्लीतील प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील संजय Sixt India आणि Sona Group यांच्याशी संलग्न होते. दोघांना दोन मुले असून, काही वर्षांत त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण झाला. करिष्माने संजयवर मानसिक आणि शारीरिक त्रासाचे आरोप केले आणि अखेर 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो. करिष्माला मोठी मेंटेनन्स रक्कम व मुलांचा खर्च मिळाला. अनेक वर्षे चाललेल्या कोर्ट केस आणि वैयक्तिक संघर्षामुळे करिष्माने अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला होता.