बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी चित्रपटसृष्टी सोडल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत, त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी केवळ शहर बदललं आहे, पण चित्रपट निर्मिती अजूनही सुरुच आहे.
अनुराग यांनी लिहिलं, "मी शहर बदलले आहे, मी चित्रपट निर्मिती सोडलेली नाही. जे लोक समजत आहेत की मी निराशेमुळे गायब झालो आहे, त्यांना सांगतो – मी इथेच आहे आणि इतका बिझी आहे की मी शाहरुख खानपेक्षा जास्त काम करत आहे. (मला ते करावंच लागतं, कारण मी त्याच्यासारखा श्रीमंत नाही!)"
त्यांनी पुढे नमूद केलं की 2028 पर्यंत त्यांचे वेळापत्रक भरलेलं आहे आणि या वर्षी त्यांचे पाच दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी यावर्षी तीन आणि दोन पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होतील.
सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असलेल्या ट्रोलर्सनाही त्यांनी उत्तर दिलं. अलीकडील मुलाखतींमध्ये त्यांनी बॉलीवूडबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, "हा उद्योग खूप विषारी झाला आहे. सर्वजण फक्त 500-800 कोटींच्या क्लबच्या मागे धावत आहेत. सर्जनशीलतेला स्थान उरलेलं नाही."
'हॉलिवूड रिपोर्टर'ला दिलेल्या दुसऱ्या मुलाखतीत ते म्हणाले, "चित्रपट बनवणं आता मजेशीर राहिलेलं नाही. सगळं विक्रीतून सुरू होतं. त्यामुळे मला मुंबई सोडून दक्षिण भारतात जाऊन काही नवीन शिकायचं आहे. नाहीतर मी आतून मरेन." असं म्हणाले.