बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदनाचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'छावा' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा हटके टीजर समोर आलेला होता, आणि आज मोठ्या प्रतीक्षेनंतर ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी विकी कौशल स्वतः उपस्थित होता. यापूर्वी, चित्रपटाच्या यशासाठी त्याने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन देखील घेतलं.
'शेर नही रहा लेकिन छावा अभी भी जंगल मे घूम रहा है. फाड देंगे मुघल सल्तनत की छाती' अशा या धमाकेदार इन्ट्रोने छावा सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चोखपणे निभावली असून त्याने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांसारखं रौद्ररूप धारण केलं आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदना या सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. तिचा हा लुक लक्षवेधी ठरत आहे.
ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर 'छावा' चित्रपटाबद्दल एक वेगळीच सकारात्मक लाट तयार झालेली आहे. अवघ्या काही तासांत 'छावा'च्या ट्रेलरने रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळवले आहेत. याशिवाय ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पाडण्यात आला आहे.
'छावा'च्या ३ मिनिटं ८ सेकंदाच्या ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी, "अंगावर शहारे आणणारे प्रसंग आहेत", "विकी कौशल या भूमिकेसाठी पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झाला आहे", "१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे नसेल, यंदा छावा डे असेल", "सर्वोत्कृष्ट अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार... विकीला यंदा सगळे अवॉर्ड्स नक्की मिळणार", "शूर आबांचा शूर छावा... छत्रपती संभाजी महाराज...", "छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो", "हा सिनेमा ब्लॉकबस्टकर होणार", 'छावा'ची १००० कोटींहून अधिक कमाई नक्की होईल" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होईल. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.