अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्ररपटामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनादेखील चांगलीच चर्चेत राहिली. मात्र आता रश्मिका एका वेगळ्याच कारणामुळे वादात सापडली आहे. एका आमदाराने रश्मिकावर खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच अभिनेत्रीच्या विरोधातील सर्व पुरावे लवकरच सादर करणार असल्याचा दावादेखील केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कॉँग्रेसचे आमदार म्हणाले की"रश्मिका मंदानानं 'किरिक पार्टी' मधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या वर्षी आम्ही तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं, तेव्हा तिनं स्पष्ट नकार दिला. आमच्या एका आमदार मैत्रिणीनं तिला आमंत्रित करण्यासाठी तिच्या घरी 10-12 वेळा भेट दिली होती, पण तिनं नकार दिला आणि या इंडस्ट्रीत वाढलेली असूनही तिनं कन्नड भाषेचा अपमान केला. आपण त्यांना धडा शिकवू नये का?"
मात्र रश्मिकाच्या टीमने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. रश्मिकाच्या टीमकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, "काही बातम्यांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, रश्मिकानं बंगळुरू फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबत अपमानास्पद वक्तव्य केली आहेत. या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत आणि त्यात कोणतंही तथ्य नाही."
रश्मिकाच्या टीमने आरोप फेटाळल्यानंतर कर्नाटक कॉँग्रेसचे आमदार रवी गानिगा म्हणाले की, "हे वक्तव्य रश्मिकाचे नाही तर तिच्या टीमचे आहे. आम्ही रश्मिकाला चित्रपट महोत्सवात आमंत्रित केलं होतं, पण तिनं नकार दिला, यासंदर्भातील कागदपत्रं आम्ही सार्वजनिकपणे जाहीर करू. अभिनेत्रीला अनेक वेळा आमंत्रित करण्यात आलं होतं, पण तिनं कोणतेही वैध कारण नसताना नकार दिला".