( Jacqueline Fernandez ) दिल्ली उच्च न्यायालयाने 200 कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने प्रवर्तन संचालनालयाच्या (ED) विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर या आरोपीकडून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप फर्नांडिसवर ठेवण्यात आला आहे. जॅकलिन फर्नांडिसने तिच्या याचिकेत ईडीने दाखल केलेली एफआयआर रद्द करावी अशी मागणी केली होती. तिने युक्तिवाद केला की, तिला सुकेशने फसवले असून, ती मनी लॉन्ड्रिंगच्या प्रक्रियेत सहभागी नव्हती.
यासोबतच जॅकलीन फर्नांडिसने न्यायालयाला विनंतीही केली होती की, तिच्या विरोधात सुरु असलेली कायदेशीर कारवाई थांबवण्यात यावी. मात्र न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील विशेष न्यायालयात सुरू असून फर्नांडिसला आता या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.