Abhijeet Khandkekar In Chala Hawa Yeu Dya New Season: लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या पर्वात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सूत्रसंचालन करत असलेले निलेश साबळे यांच्या जागी आता अभिजीत खांडकेकर घेणार आहे. अभिजीत खांडकेकर या नव्या भूमिकेबद्दल प्रथमच माध्यमांसमोर व्यक्त झाला असून, या संधीबद्दल त्याने उत्साह, जबाबदारी आणि आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पाहूयात नेमकी काय भूमिका मांडली अभिजीत खांडकेकर ....
झी मराठीसोबतचं माझं नातं अगदी माझ्या करिअरच्या सुरवातीपासून आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आलो आणि आजपर्यंत काम करत आहोत. त्यामुळे झी आणि माझं नातं खास आहे. त्यात चला हवा येऊ द्या सारखा अत्यंत लोकप्रिय अश्या कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं गेलं तो माझ्यासाठी तो आनंदाच क्षण होता. मुळात मला निवेदनाची प्रचंड आवड आहे मी ही संधी चॅलेंज म्हणून घेत आहे.
कारण गेली 10 वर्ष ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे, त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. प्रेक्षकांना आधीच्या पर्वा प्रमाणेच या पर्वातुन ही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहे यची पूर्ण कल्पना आहे. पण मला त्याच दडपण निश्चित नाही. मी या सिजनसाठी प्रचंड उत्साही आहे. मला हेच म्हणायचे आहे कि प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत, त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा आहे कि जितकं प्रेम या आधीच्या पर्वांना दिले, तितकंच भरभरून प्रेम या पर्वाला हे द्यावं. यावेळीच चला हवा येऊ द्या नवीन प्रकारे सादर होणार आहे, आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याची ही काळजी घेतली आहे. माझं हेच म्हणणं आहे कि 10 वर्ष प्रेम देऊन या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या शिखरावर नेऊन ठेवलं तेच प्रेम आणि आशीर्वाद प्रेक्षकांकडून या पर्वासाठी अपेक्षित आहे." अशी प्रतिक्रिया अभिजीत खांडेकर यांनी दिली.
अभिजीत खांडकेकरच्या या सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. आता पाहावं लागेल, की नवा सूत्रधार आणि नव्या जोशातला कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात पुन्हा आपलं स्थान मिळवतो का!