देशातील सर्वात विश्वासार्ह आणि मोठ्या प्रोडक्शन बॅनर्सपैकी एक असलेले आमिर खान प्रोडक्शन्स आता आपल्या नव्या चित्रपट हॅपी पटेल: खतरनाक जासूससह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. हा एक स्पाय-कॉमेडी चित्रपट असून, अभिनेता-स्टँडअप कॉमेडियन वीर दास या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे, तेच या चित्रपटात मुख्य भूमिकेतही दिसणार आहेत. त्यांच्या सोबत मोना सिंग आणि मिथिला पालकर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर आणि आधी रिलीज झालेले गाणे यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या अगदी जवळ येताना, मेकर्सनी आता ‘फक्त अपन’ हे नवं गाणं प्रेक्षकांसाठी सादर केलं आहे.
हे गाणं अत्यंत एनर्जेटिक आणि मजेशीर असून, त्यात मराठी आणि इंग्लिश रॅपचा भन्नाट मेळ आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये वीर दास, मोना सिंग, मिथिला पालकर आणि शरिब हाश्मी मुंबईच्या रस्त्यांवर एकमेकांकडे “कॉन्फिडेन्शियल” असा शिक्का असलेली ब्रीफकेस पास करताना दिसतात. संपूर्ण व्हिडिओमध्ये एक वेगळीच अफरातफर आणि धमाल पाहायला मिळते.
गाण्याचा शेवट वीर दास थेट ही सगळी धावपळ एका सिनेमा हॉलमध्ये घेऊन जातात, आणि त्याचसोबत चित्रपटाची रिलीज डेट दाखवली जाते. कॅची बीट्स, मजेशीर शब्द आणि वायब्रंट व्हिज्युअल्समुळे ‘फक्त अपन’ हे गाणं चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढवतं.
लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार यांसारख्या अर्थपूर्ण आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आमिर खान प्रोडक्शन्स, याच परंपरेला पुढे नेत पुन्हा एकदा वीर दाससोबत या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. गो गोवा गॉन, बदमाश कंपनी आणि कल्ट हिट दिल्ली बेलीमधील दमदार अभिनयासह, आपल्या ग्लोबल कॉमेडी स्पेशल्समुळे प्रसिद्ध असलेले वीर दास, दिल्ली बेलीनंतर या बॅनरसोबत दुसऱ्यांदा काम करत आहेत. त्यामुळे हे रीयुनियन प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हॅपी पटेल: खतरनाक जासूस, दिग्दर्शक म्हणून वीर दास यांचा पहिलाच चित्रपट असून, हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.