केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटली तरीही या चित्रपटाचा क्रेझ कायम आहे. आजही अनेक सिनेमागृहांत या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. अनेकांना तिकीटं मिळत नसल्याने अभिनेता सुशांत शेलार आणि शिवसेना प्रणित शिव चित्रपट सेनाने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा मोफत शो प्रेक्षकांसाठी आयोजित केला आहे.
आज (28 जुलै 2023) रात्री सात वाजता प्रेक्षकांना माटुंग्यातील सिटी लाइट थिएटरमध्ये 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळणार आहे. खास म्हणजे 'बाईपण भारी देवा'चा मोफत शो निलम ताई गोऱ्हे, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, नरेश म्हस्के, मनीषा कायदे, शितल म्हात्रे, कामिनी शेवाळे, कला शिंदे, प्रिया सरवणकर आणि गिरीष धानुरकर या पाहुणे मंडळीच्या उपस्थित पार पडणार आहे.
विशेष पाहुण्यांसह 'बाईपण भारी देवा'च्या मोफत शोला या सिनेमातील सर्व कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, सह-कलाकार, तंत्रज्ञ तसेच आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेता आणि शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष सुशांत शेलार या मोफत शोचा आयोजक आहे.
सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाने वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.