(Hemant Dhome ) हिंदी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य, असा शासन निर्णय केला आहे.
यामध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा असल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत त्यानुसार शिक्षक पुरवण्यात येईल अन्यथा ती ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल.
यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा. हिंदी ही तृतीय भाषा असेल,ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?)
यासोबतच ते पुढे म्हणाले की, म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे. पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही? एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय? असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.