बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा संसदेच्या आवारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी रागाने ढकलल्याचे दिसते. त्यावेळी त्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर इतर खासदारांशी बोलत होत्या. अचानक आलेल्या व्यक्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताच, जया बच्चन यांनी त्याला हटवले आणि नाराजी व्यक्त केली. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक थोडे गोंधळलेले दिसले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी जया बच्चन यांच्या वागणुकीवर टीका केली. त्यातच अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिले, “सर्वात बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक तिचा राग आणि नखरे सहन करतात, कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे.”
यावरच न थांबता, कंगनाने जया बच्चन यांच्या डोक्यावर असलेल्या समाजवादी पार्टीच्या टोपीलाही लक्ष्य केले. तिने लिहिले, “ही टोपी कोंबड्याच्या तुऱ्यासारखी दिसते आणि त्या स्वतः एका भांडकुदळ कोंबडीसारख्या वाटतात. हे खरंच लज्जास्पद आहे.”
नेटिझन्सनीही यावर प्रतिक्रिया देत जया बच्चन यांना अहंकारी, उद्धट आणि चिडखोर म्हणत अनेक कमेंट्स केल्या. यापूर्वीही त्यांच्या रागीट स्वभावामुळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे त्या सोशल मीडियावर चर्चेत राहिल्या आहेत.