बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आली आहे. 2025 च्या महाकुंभ मेळ्यादरम्यान तिला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदवी मिळाली होती. यानंतर तिचे नाव बदलून यमाई ममता नंदगिरी असे ठेवण्यात आले. मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. काही दिवसानंतर तिने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता यावरुन किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी या शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजर राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी ममता कुलकर्णीबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या की, "अडीच-तीन वर्षांपासून ममता माझ्या संपर्कात होती. ती म्हणाली की सनातन धर्मामध्ये कार्य करायचे आहे . मला सनातन धर्मासाठी आता स्वतःला वाहून घ्यायचे आहे. ती याआधीही साधना करायची. मंत्र, जप सर्व काही करायची".
दरम्यान ममता कुलकर्णीचे नाव अबू सालेमबरोबर जोडले गेले होते. या सगळ्या प्रकरणावर महामंडलेश्वर म्हणाल्या की, "ते सगळं काही खरं होईल. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत होत्या. पण सगळ्या केसेस बंद झाल्या होत्या. सगळ्या नोटिसदेखील हटवल्या गेल्या होत्या. त्यानंतरच आम्ही पट्टाभिषेक केला. ती एक कलाकार आहे. जो सनातन धर्माच्या शरणात येणार त्यांचा आम्ही तिरस्कार कसा करु? मी आज हे विचारेन की ममताने इस्लाम कबूल केला असता आणि हज मदिनाला जाऊन आली असती तर हे जे सनातनी इतका विरोध करत आहेत ते काय करु शकले असते? "
पुढे त्या म्हणाल्या की, "आमच्या किन्नर आखाड्यामध्ये जर तुमचे काही पदच नसेल तर तुम्ही काय करणार होतात? सर्व प्रकरण झाल्यानंतर ममताने राजीनामादेखील दिला. मात्र हा राजीनामा परत मागेदेखील घेतला. तिचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिचा व्हिडीओ बघून खूप वाईट वाटलं होतं".