मराठी चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दहावा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या मुख्य भूमिकेतील ‘फुलवंती’ या चित्रपटाने सर्वाधिक सात पारितोषिकांची कमाई करत यंदाचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला
एकूण 16 नामांकनांमधून सात पुरस्कार पटकावत ‘फुलवंती’ने आपल्या कलात्मकतेचं व कौशल्याचं वेगळं स्थान अधोरेखित केलं. त्यापाठोपाठ ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कार मिळवत महत्त्वाची घौडदौड केली.
या प्रतिष्ठित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या लोकप्रिय जोडीने केलं. कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे उषा मंगेशकर यांना त्यांच्या अमूल्य आणि दीर्घकालीन योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणं.
महेश मांजरेकर यांना ‘जुनं फर्निचर’साठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीच्या विभागात, प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार) यांना संयुक्तपणे उत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळाला. आदिनाथ कोठारे यांना ‘पाणी’साठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं.
तसेच जितेंद्र जोशी यांना ‘घात’ चित्रपटासाठी आलोचकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. ‘सत्यशोधक’ चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी राजश्री देशपांडे यांना क्रिटिक्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान प्राप्त झाला.
2024 वर्षात म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दर्जेदार चित्रपट, कलाकारांच्या दमदार कामगिरी आणि सन्मानाच्या सोहळ्यामुळे लक्षवेधी ठरला.