मनोरंजन

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; नितीन वैद्य, बाविस्कर, छाया कदम, साबळे व संतोष आंधळे मानकरी

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जातो पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे. सोबतच 'भुरा' या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार जाहीर झाला आहे.

मंगळवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्या दरम्यान स्टॅन्ड अप कॉमेडी या लोकप्रिय ठरत चाललेल्या कलाप्रकारात एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या बीडच्या अंकुर तांगडे आणि नागपूरच्या नेहा ठोंबरे यांचा 'ब्लु मटेरियल-दलितों का शो(षण)' हा स्टॅन्ड अप कॉमेडीचा प्रयोगही होणार आहे. यंदाचा हा चोविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले नव्हते त्यामुळे यावर्षी सलग तीन वर्षांचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या गाजलेल्या आत्मकथनाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २०१८ पासून नावाजलेल्या आत्मकथनांना ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या तिसऱ्या 'बलुतं' पुरस्कारासाठी 'भुरा' पुस्तकाचे लेखक प्राध्यापक शरद बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक शरद बाविस्कर अध्यापनाचे काम करत आहेत. धुळे ते जेएनयु असा प्रवास सांगणारे त्यांचे 'भुरा' हे पुस्तक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.

दया पवार स्मृती पुरस्कारांच्या इतर मानकऱ्यांपैकी नितीन वैद्य हे गेल्या तीन दशकांपासून प६कारिता, सिनेमा आणि मालिकेच्या क्षेत्रात कार्यरत असून दशमी क्रिएशन या निर्मिती संस्थेचे ते संचालक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती, पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि जय भवानी, जय शिवाजी या गाजलेल्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. 'सैराट'फेम छाया कदम या आघाडीच्या अभिनेत्री असून गंगुबाई काठियावाडी, झुंड, सैराट, न्यूड, फॅन्ड्री, अंधाधुन या गाजलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांचे जोरदार कौतुक झाले होते.

एका आदिवासी आश्रमशाळेत लिपिक पदावर काम करत असलेल्या अनिल साबळे यांची मराठी काव्यविश्वात एक आंतरिक कळवळ्याचा कवी म्हणून ओळख आहे. त्यांचा 'टाहोरा' आणि 'पिवळा पिवळा पाचोळा' हे कविता संग्रह गाजले आहेत. दया पवार स्मृती पुरस्काराचे चौथे मानकरी संतोष आंधळे यांनी २० वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय पत्रकारितेमध्ये भरीव कामगिरी केली असून समाजामध्ये अवयवदान चळवळीच्या जनजागृतीसाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्याशिवाय समाजातील गरीब रुग्णांचे प्रश्न सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये मांडून त्यास वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे.

दया पवार स्मृती पुरस्काराचे यंदाचे २४ वे वर्ष असून आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, समर खडस, कॉ. सुबोध मोरे, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, सयाजी शिंदे, राहुल कोसंबी, आनंद विंगकर, मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख, मंगेश बनसोडे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य