अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे नाव आज बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये नामांकित आहे. बिहारमधील एका छोट्या गावात ५ सप्टेंबर रोजी पंकज यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आजही गावात शेती करतात आणि लहानपणी पंकज हे देखील शेतीच्या कामात आपला हातभार लावायचे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने पंकज त्रिपाठीचा अभ्यास अनेकवेळा झाडाखाली बसून पूर्ण व्हायचा.
अकरावीत त्यांनी गावातल्या नौटंकीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्यात त्यांनी मुलीचं पात्र स्वीकारलं. पंकजची ही शैली लोकांना खूप आवडली आणि लोक त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला देऊ लागले. इथून पंकज त्रिपाठीच्या मनात अभिनयाबद्दल आवड निर्माण झाली. पण त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. म्हणून त्यांनी पंकजला गावाबाहेर शहरात जाऊन शिक्षण घेण्यास सांगितलं.
पंकजने इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला. या काळात ते थिएटरमध्ये सामील झाले. अभिनयातलं करिअरचं स्वप्न उराशी बाळगून स्वतःला परिष्कृत करत राहिले. यावेळी खर्च भागविण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे हॉटेलमध्ये काम केल्यानंतर पंकजने दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
मुंबईत कठीण दिवसांचा करावा लागला सामना
पंकज त्रिपाठींनी दिल्लीहून मुंबई गाठली पण इथं काम मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांना पहिला ब्रेक 'रन' या चित्रपटात पहिल्यांदा काम मिळालं. ज्यामध्ये त्याची खूप छोटी भूमिका होती आणि त्यामुळे त्यांच्या कामाची कुणीही दखल घेतली नव्हती. 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने पंकज त्रिपाठीचे करिअरचं दार उघडले. ज्यात त्याच्या भूमिका आणि काम या दोन्हींचं प्रचंड कौतुक झालं. यानंतर पंकजने मागे वळून पाहिलेच नाही आणि मिर्झापूर या वेबसीरिजद्वारे त्यांनी यशाची पायरी गाठली.