सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतोय. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चार दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात अवघ्या चार दिवसात तब्बल ५२९.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात ८०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमा केला आहे.
यातच आता चित्रपटाचे निर्माते सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. कारण, राजपूत नेते राज शेखावत यांनी रविवारी चित्रपट निर्मात्यांना धमकी दिली आहे. त्यांच्या आरोपानुसार, या चित्रपटाद्वारे 'क्षत्रिय' समाजाचा अपमान करण्यात आला आहे.
राजपूत नेते राज शेखावत यांनी रविवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी निर्मात्यांना धमकी दिली आणि आरोप केला की चित्रपटात ‘क्षत्रिय’ समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली आहे. त्यांनी X वर लिहिले की, ‘पुष्पा 2 मधील शेखावतचे पात्र नकारात्मक आहे. क्षत्रियांचा पुन्हा अपमान होणार, करणी सेना सज्ज रहा.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना लवकरच फटका बसणार आहे.
नेते राज शेखावत यांनी पुष्पा 2 च्या निर्मात्यांवर आरोप केले आणि पुढे म्हणाले की चित्रपटात शेखावत शब्दाचा वारंवार ‘अपमान’ केल्याने क्षत्रिय समाजाचा अपमान झाला आहे. यासोबतच त्यांनी निर्मात्यांना चित्रपटातून हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राजपूत नेते राज शेखावत यांच्या या धमकीवर अद्यापपर्यंत पुष्पा 2 च्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.