अल्लू अर्जुनच्या पुष्पानं जोरदार धमाका केला होता. आता त्याचा सिक्वल असलेल्या पुष्पा 2 नं देखील बॉक्स ऑफिस दणाणून सोडलंय. 5 डिसेंबरला रिलिज झालेल्या 'पुष्पा २' नं देशभरात तब्बल 164.25 कोटींचा गल्ला जमवत कमाईचे नवे रकॉर्ड तयार केले आहेत. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
दमदार ओपनिंगनंतर 'पुष्पा २' नं दुसऱ्या दिवशीही धमाकेदार कामगिरी केली. एका रिपोर्टनुसार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शुक्रवारी 'पुष्पा २' नं पाचही भाषांमध्ये मिळून 90.01कोटींची कमाई केली. त्यातील बहुतेक कलेक्शन हे हिंदीतून झाले. या सिनेमाने हिंदीतून ५५ कोटी रुपये, तेलगूमधून २७.१ कोटी रुपये, तमिळमधून ५.५ कोटी रुपये, कन्नडमधून ६० लाख रुपये आणि मल्याळममधून १.९ कोटी रुपये कमावले आहेत. हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत. दोन दिवसांत देशभरात 'पुष्पा २'ची एकूण कमाई २६५ कोटींवर पोहोचली आहे.