जम्मू-काश्मीरमधील सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी (आरजे) सिमरन सिंहने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सिमरन सिंह ही गुरुग्राममधील सेक्टर-47 येथील एका सोसायटीत भाड्याने राहत होती. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काल तिचा तिच्याच फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजते. तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ती जम्मूची रहिवासी होती. ती येथे एका मैत्रिणीकडे राहात होती, तिनेच पोलिसांना माहिती दिली.
आरजे सिमरन सिंह ( वय 25) ही सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सरही होती. इस्टाग्रामवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 13 डिसेंबर रोजी तिची शेवटची पोस्ट असून त्यामध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, सिमरन सिंहच्या निधनाच्या वृत्तामुळे तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून तिला श्रद्धांजली वाहिली जात आहे