चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा ‘सैय्यारा’ लवकरच ओटीटीवर दाखल होणार आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडत आता डिजिटल दुनियेत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
ओटीटीवरील प्रदर्शना संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ‘सैय्यारा’ आता थेट दिवाळीच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेहमीप्रमाणे एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांत ओटीटीवर दाखल होतो, पण निर्मात्यांनी यावेळी वेगळा निर्णय घेतला आहे. सध्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि तोंडी प्रसिद्धी लक्षात घेऊन, जास्तीत जास्त कमाईसाठी ओटीटी रिलीज थोडा लांबवण्यात आला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सैय्यारा’ येत्या ऑक्टोबर महिन्यात, दिवाळीच्या वीकेंडला, ओटीटीवर स्ट्रीम केला जाणार आहे. अद्याप प्लॅटफॉर्मचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, मात्र प्रेक्षकांना घरबसल्या हा सिनेमा पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे.
केवळ 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत 170 कोटींहून अधिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 250 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. त्यामुळे नवोदित कलाकारांसहही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावरही ‘सैय्यारा’ची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमातील गाणी, दृश्यं आणि डायलॉग्सवर आधारित रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे ओटीटी रिलीजनंतरही या सिनेमाची क्रेझ कायम राहणार हे नक्की!