(Bigg Boss Marathi Season 6:) बिग बॉस मराठी सीजन 6 सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये याची जोरदार चर्चा रंगत आहे. पाचव्या पर्वाला भक्कम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुढील सीजनबाबत उत्सुकता वाढली आहे. याचदरम्यान बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने एक महत्त्वाची माहिती देत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
बिग बॉस हिंदी सीजन 19 चा फिनाले 7 डिसेंबरला पार पडणार असून त्यानंतर थेट बिग बॉस मराठी सीजन 6 प्रेक्षकांसमोर येणार आहे. या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश मांजरेकर करतील की रितेश देशमुख— यावर तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर सलमान खाननेच या चर्चेला पूर्णविराम देत अधिकृत घोषणा केली.
रितेश देशमुख पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत
मागील वर्षी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखने सांभाळलं होतं आणि त्याच्या अनोख्या शैलीला प्रेक्षकांकडून अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच त्याला यंदाही शो होस्ट करावा, अशी मागणी चाहत्यांकडून सातत्याने होत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, सलमान खानने रितेशचं नाव जाहीर करताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बिग बॉसच्या घरात यावेळी कोणते स्पर्धक दाखल होतील यावरून चर्चेला जोर आला आहे.
मागील पर्वातील ठळक स्पर्धक
सीजन 5 मध्ये वर्षा उसगांवकर यांसारखी अनेक नामांकित चेहरे घरात दिसले. निक्की तांबोळी संपूर्ण सीजनमध्ये चर्चेचा विषय ठरली. तर सूरज चव्हाणने विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. साध्या वेशात आणि फार कमी सामान घेऊन घरात प्रवेश केलेल्या सूरजला जवळपास सर्वच घरातील सदस्यांनी मनापासून साथ दिली. काहींनी तर स्वतःचे कपडेही त्याला दिले.
रितेश देशमुखच्या पहिल्याच होस्टिंगमध्ये त्याने आपल्या संवादशैलीने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि सीजन 5 हा मराठी बिग बॉसच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेतला सीजन ठरला.