मनोरंजनसृष्टीत हास्याची जादू घालणारे जेष्ठ अभिनेता सतीश शाह यांचे काल (25 ऑक्टोबर) वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळ किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले सतीश शाह यांनी चार दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपट, नाट्य आणि टेलिव्हिजनमध्ये आपला अभिनयाचा ठसा सोडला. त्यांच्या सहज आणि नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
निधनाच्या बातमीनंतर त्यांच्या मित्रपरिवार आणि सहकलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. जेष्ठ अभिनेता आणि मित्र सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "सतीश आणि मी नेहमी मेसेजवर बोलायचो. त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी मेसेज आला होता . ज्यात तो म्हणाला होता की, सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती .सतीशने ऐकवलेल्या गाण्यावर मधु आणि सुप्रिया नाचल्या होत्या. त्यावेळी सतीश पूर्णपणे ठीक होता. पण त्याच्या निधनाची अचानक बातमी ऐकून धक्का बसला"
सतीश शाह आणि सचिन पिळगावकर यांनी 1987 मध्ये आलेल्या मराठी चित्रपट गंमत जंमत मध्ये एकत्र काम केले होते. सचिन म्हणाले, "त्या चित्रपटादरम्यान आमची मैत्री खूप घट्ट झाली. त्यानंतर आम्ही कधीही काम केले नाही, पण मैत्री कायम राहिली."
सतीश शाह हे नेहमीच आपल्या सभोवतालच्या लोकांना आनंद देत राहिले. सचिन पिळगावकर यांनी सांगितले, "तो प्रत्येक वेळी आनंदी राहायचा आणि इतरांनाही आनंदी ठेवायचा. पण तुम्हाला कधीही माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे. तुमची वेळ कधी येईल हे तुम्ही ठरवू शकत नाही." सतीश शाह यांचे निधन त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मनोरंजनसृष्टीसाठी अपूरणीय नुकसान ठरले आहे. त्यांच्या अद्वितीय अभिनयाची आणि हास्याची आठवण कायम राहणार आहे.