'सूर्यवंशी' चित्रपटाला प्रेक्षकानकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अंबरनाथमध्ये मिराज सिनेमाच्या वतीनं पोलिसांसाठी 'सूर्यवंशी' हा चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन करण्यात आला.
'सूर्यवंशी' हा चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा असून त्यांच्या चित्रपटात पोलिसांची सकारात्मक भूमिका दाखवली जाते. सिंघम, सिंबा आणि आता सूर्यवंशी चित्रपटातून पोलिसांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळेच पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिराज सिनेमाने आज अंबरनाथमध्ये या चित्रपटाचा एक विशेष शो पोलिसांसाठी आयोजित केला होता. यावेळी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे, अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, मिराज सिनेमाचे महाराष्ट्राचे रिजनल मॅनेजर परवेश कुमार हे उपस्थित होते. मिराज सिनेमाजच्या वतीनं यावेळी पोलिसांचं स्वागत करण्यात आलं. या शो पाहण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गर्दी केली होती. चित्रपटगृह हाऊसफुल झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. हा शो आयोजित केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी मिराज सिनेमाचे आभार मानले.