Sushmita Sen and Lalit Modi
Sushmita Sen and Lalit Modi Team Lokshahi
मनोरंजन

Lalit Modi-Sushmita Sen: सुश्मिता सेनचे खरंच चुकलं का?

Published by : Team Lokshahi

चार दिवसांपूर्वी भारतीय व्यावसायिक जगताचे ‘बॅड बॉय‘ समजल्या जाणाऱ्या ललित मोदींनी (Lalit Modi) एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचे फोटो ट्विट केले आणि आपल्या देशभरात एकच लाट उसळली. अनेकांचे हृदय तुटले, अनेकांचे स्वप्न भंगले, त्या अभिनेत्रीला एकदाही न भेटलेल्या तिच्या करोडो चाहत्यांचा हिरमोड झाला. आपण एखाद्या चित्रपटसृस्ष्टीतील अभिनेत्रीवर प्रेम करत असतांना अचानक तिचे असे कुणासोबत तरी फोटो येणे, त्यामुळे दुःख होणे या गोष्टी आपण समजू शकतो. ललित मोदी आणि सुश्मिता सेन (Sushmita Sen) यांचे एकत्र फोटोज पाहून सुश्मिताच्या चाहत्यांना ललित मोदींची असूया वाटणे अगदी साहजिक आहे आणि हे प्रकरण इथपर्यंत ठीक होतं पण या खरा प्रकार सुरु झाला त्यानंतर…

दोन माणसांना त्यांचे आयुष्य कसे जगायचे हे ठरवण्याचा अधिकार आहे ही साधी सोपी गोष्ट भारतात फारशी कुणाला माहितीच नाही बहुधा कारण ललित मोदींनी त्यांच्या नात्यासंदर्भात ट्विट केल्याने हातातली सगळी कामे सोडून त्या ट्विटला व्हायरल करणारी जमात फक्त आणि फक्त भारतातच सापडेल. तरुण रक्ताच्या या तरुण देशात तरुण एवढे रिकामे आहेत की त्यांना ललित मोदींचे वैयक्तिक आयुष्य व्हायरल करायला खूप वेळ आहे. मुळात भारतात एखाद्या सार्वजनिक आयुष्यात असलेल्या चित्रपट कलाकाराला, क्रिकेट खेळाडूला गोपनीयतेचा कसलाही अधिकार संविधानाने दिला असला तरी समाजाने दिलेला नाही. त्यामुळे त्यानंतर ललित आणि सुश्मिताच्या चारित्र्याचे परीक्षण करणाऱ्या ट्विट्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सचा महापूर आला. कुणी ललित मोदीला ‘सुदैवी‘ म्हणत होतं, कुणी सुष्मिताला ‘दुर्दैवी‘ म्हणत होतं पण हे सगळं होत असताना अनेकजण सुश्मिता कशी ललित मोदींच्या पैश्यांमुळे ललित मोदींकडे गेली आहे, आपल्या देशाला आयपीएल (IPL) सारखा क्रिकेटोद्योग दिलेल्या ललित मोदींकडे किती संपत्ती आहे, ते किती मोठे व्यावसायिक आहेत याचे कौतुक आणि सुश्मिता कशी चुंबकासारखी त्या पैश्याकडे आकर्षित झाली हे पटवून देणारे सिद्धांत मांडले गेले.

सळसळत्या रक्ताच्या उर्जावान तरुणांनी एक सुंदर ‘बाई‘ कशी पैसे असणाऱ्या एका श्रीमंत पुरुषाच्या ‘मांडीवर‘ बसते याचे रसरशीत वर्णन केले. अनेकांनी संशोधनही केले बरं का… म्हणजे संशोधनासाठी मागील काही दशकांमध्ये एकही नोबेल न मिळालेल्या आपल्या देशातील ‘संशोधक‘ वृत्तीच्या तरुणांनी काही वर्षांपूर्वी ललित मोदींनी केलेले ट्विट्स आणि सुश्मिताचे फोटो यांचा परस्परसंबंध जुळवून आणण्यात दाखवलेले कसब वाखाणण्याजोगे होते तर देशासमोरचे अनेक गंभीर प्रश्न बाजूला सारून ‘ललित-सुश्मिता’च्या कहाण्या रचणाऱ्या या तरुणांच्या देशात ‘पैश्यासाठी हपापलेली सुश्मिता‘ हा विषय ज्वलंत बनला. आता हे महत्कार्य करीत असतांना आपण एखाद्या महिलेच्या चारित्र्याला चव्हाट्यावर आणून त्याची लख्तरे जगासमोर टांगत आहोत याचे भान आम्हाला राहत नाही कारण आम्ही मांडलेले सुश्मितावरील सिद्धांत, ललित मोदींवर केलेले संशोधन याला कितीतरी लाईक्स मिळतात, कमेंट्स केल्या जातात आमच्या या प्रयत्नांमुळे देशात अनादिकालापासून महिलेला ‘वस्तू‘ समजणाऱ्या मानसिकतेला किती गुदगुल्या होतात, पुरुषांच्या तुलनेत महिला कशा हीन असतात हे सांगणाऱ्या माणसांना आमचे हे संशोधन किती आवडते तुम्हाला याची कल्पना तरी आहे का? जरी डॉलर 80 रुपयांचा झाला असेल, देशात काही ठिकाणी लोक मरत असतील, आमच्यासारख्याच तरुणांना केवळ खरं बोलल्यामुळे तुरुंगात टाकले जात असेल, जातीवाद, भ्रष्टाचार कितीही वाढला असेल तरी ‘ललित-सुश्मिता’ प्रकरणावर आम्ही केलेल्या संशोधनामध्ये या सगळ्या समस्यांना मुख्य प्रवाहातील चर्चेमधून हाकलून देण्याची ताकद आहे हे तुम्हाला कदाचित माहितीच नसेल. असो…

हजारो करोड रुपयांचे मालक ललित मोदी जरी असले तरीही सुश्मिता सेनने देखील आपल्या बुद्धीच्या जोरावर करोडो रुपये कमावले आहेत हे आम्हाला दिसतच नाही. ज्या सुश्मिताच्या फोटोजवर आम्ही लाळ टपकावीत आहोत ती सुश्मिता दोन मुलीची जबाबदार आई आहे हेही आम्ही विसरतो. आम्हाला एकच फोटो खुणावत असतो आणि तो फोटो म्हणजे एक सुंदर बाई एका करोडपतीच्या मांडीवर बसली आहे हो ना? अशावेळी ललित मोदींचे लग्न झाले आहे का? त्यांचे चारित्र्य कसे आहे? किंवा त्यांनी घेतलेल्या या निर्णयाला चुकीचे ठरविणारे संवाद कुठेही केले जात नाहीत आणि त्याला कारण असते ललित मोदींची एक यशस्वी उद्योजक म्हणून असणारी ओळख, पैसे आणि त्यांचे केवळ ‘पुरुष‘ असणे. सुश्मिता सेनच्या आधी रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) त्याच्या पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हत्या केल्याचा आरोप होता.

तुम्हाला माहितीय सुश्मिता सेन या आधी रोहमन शॉल (Rohman Shawl) नावाच्या एका पुरुषाला डेट करत होती त्यावेळी मात्र आपला रोख जरा वेगळा होता त्यावेळी सुश्मिता कशी आपल्यापेक्षा कमी वयाच्या ‘पोरा’ला आपल्यासोबत ‘ठेवत‘ आहे असा आमचा सूर होता. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) बाबतीतही तेच 37 वर्षांचा ‘पुरुष‘ अर्जुन कसा बाळबोध आहे आणि 48 वर्षांच्या मलायकाने त्याच्यावर कसं आपलं जाळं फेकलं आहे याचीच चर्चा आम्ही करत बसतो. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रकरणात ‘बाई’ कशी चुकीची आहे, कपटी आहे, पैसालोलुप आहे हेच चर्चिलं जातं. एकदाही एकाही पुरुषाला यासाठी आम्ही काहीही विचारत नाही कारण आम्ही कधीच ‘विचार‘ करत नाही. आमचा असा विश्वास झालाय की हे जग केवळ आणि केवळ पुरुष चालवतात, ‘बाई‘ ही एक वस्तू आहे तिला पैश्याने विकत घेतलं जाऊ शकतं, अंगावर डिओड्रंट मारून आकर्षित केलं जाऊ शकतं, गजरा देऊन लाजवलं जाऊ शकतं, पुरुषाला ‘बाई’सोबत काहीही करता येतं फक्त ती ‘धमक‘ पुरुषामध्ये पाहिजे. हो की नाही?

एखाद्या गरीब पुरुषाने एखादी श्रीमंत बाई पटवली की त्या पुरुषाला ‘चतुर‘ म्हंटले जाते आणि एखाद्या गरीब बाईच्या आयुष्यात एखाद्या श्रीमंत पुरुष आला की त्या बाईला ‘चारित्र्यहीन‘ म्हटले जाते दोन्ही उदाहरणांमध्ये ‘पुरुष‘ कधीच खलनायक ठरत नाही फक्त बाई मात्र ‘बदचलन‘ ठरवली जाते. हा आपल्या समाजाचा दुटप्पीपणा आहे.

या लेखाचा मथळा वाचून इथपर्यंत आलेल्या प्रत्येकाला हे जाणून घ्यायला हवे की सुश्मिता सेनच्या चारित्र्याला बदनाम करून आपण आपल्या पुढच्या पिढीला हे सांगत आहोत की ‘बाई‘ ही पैश्याने, संपत्तीने जिंकता येणारी ‘वस्तू‘ आहे. काहीही करा, कसेही वागा, पैसे कमवा आणि ‘बाई’ आपोआप तुमच्याकडे येईल. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात? याला काहीही किंमत नाही त्यामुळे सुश्मिता सेनवर आरोप करणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घायला हवं की प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला त्याचा किंवा तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आपण करत असलेली कमेंट, आपण बनवत असलेले विनोदी फोटो हे आपल्या सडलेल्या, गंजलेल्या, रूढीवादी विचार आणि संस्कारांचे प्रदर्शन करत असतात. सुश्मिता सेन ही बाजारात ठेवलेली एखादी वस्तू नाही ती ‘माणूस‘ आहे. तिने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या ताकदीवर घडवले आहे आणि तिने तिच्या आयुष्यात काय करायचे हा फक्त आणि फक्त तिचा निर्णय आहे. ललित मोदी आणि सुश्मिता सेन ही दोन स्वतंत्र माणसे आहेत त्यांनी त्यांचे आयुष्य कसे जगावे हे आपण सोशल मिडियावर ठरवू शकत नाही.

21व्या शतकात मानसिक आरोग्याबद्दल बोलून, पालकत्व शिकविणाऱ्या शिकवण्या लावून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उत्तम विश्व निर्माण करण्याबद्दल आपण खूप बोलतो पण जोपर्यंत आपल्या सोयीनुसार या जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला केवळ लिंगावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याची मानसिकता कमी होणार नाही तोपर्यंत आपण एक सुंदर जग बनवू शकत नाही हेच खरं. आपल्या समजात दिसून येणारे असे अमानवी दोष जोपर्यंत दूर केले जात नाहीत तोपर्यंत आपले उज्वल भविष्याचे स्वप्न केवळ कागदावरच राहील यात मला तरी अजिबात शंका नाही. शेवटी एवढंच म्हणेन की समाज जर असाच वागत असेल तर माझ्या बहिणीने, बायकोने, जोडीदाराने माझ्या आयुष्यातील कुठल्याच महिलेने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले नाही पाहिजे, त्या यशस्वी झाल्या नाही पाहिजेत कारण जर का तसं चुकूनही झालं तर त्यांच्या चारित्र्यावर चिखल उडविणारे हात या जगात अजूनही बक्कळ संख्येने आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ