60 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांना मुंबई उच्च न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या दोघांविरोधात लूकआऊट नोटीस (LOC) जारी केली असून, त्यामुळे त्यांनी 2 ते 5 ऑक्टोबरदरम्यान कौटुंबिक सहलीसाठी फुकेटला जाण्याची परवानगी मागत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.
मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी विरोध नोंदवला. त्यात सांगण्यात आलं की, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात यापूर्वीचेही काही गुन्हे प्रलंबित आहेत, त्यामुळे दिलासा देणं योग्य ठरणार नाही. अखेर न्यायालयाने दिलासा नाकारत सुनावणी दोन आठवड्यांनी तहकूब केली.
आर्थिक गुन्हे शाखेने 60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी राज कुंद्रा यांची जवळपास पाच तास चौकशी करून जबाब नोंदवला आहे. 10 सप्टेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार 15 सप्टेंबर रोजी ते आयुक्तालयात हजर राहिले. पुढील काळात त्यांना पुन्हा समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे. याच प्रकरणात शिल्पा शेट्टीलादेखील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
ऑगस्ट 2025 मध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2015 ते 2023 दरम्यानच्या आर्थिक व्यवहारात 60 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेली ही रक्कम परत न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्या परदेश प्रवासाच्या योजना न्यायालयीन निर्णयामुळे सध्या ठप्प झाल्या आहेत.