महाराष्ट्राचे लाडके भावजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरी लवकरच मंगल धडधडणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त समोर आले असून, मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीच त्यांची सून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मनोरंजन विश्वात निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी ओळख निर्माण केलेल्या सोहमने ‘ललित 205’ ही मालिका निर्मित केली होती. तसेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या टप्प्याविषयीची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम बांदेकर लवकरच अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारत पूजाने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषतः ‘स्वाभिमान’ या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चाहत्यांची लाडकी बनली आहे.
याआधी सोशल मीडियावर झालेल्या Ask Me Anything या सेशनमध्ये चाहत्याने सोहमला लग्नासाठी त्याला कशी मुलगी हवी आहे, असं विचारलं होतं. त्यावर हसत-खेळत सोहमने उत्तर दिलं होतं – “कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस.” त्याचे हे उत्तर त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या या विवाहाच्या चर्चेमुळे बांदेकर कुटुंब आणि मराठी मनोरंजनसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे. आदेश बांदेकरांचे चाहते आणि मराठी मालिकाविश्वातील रसिक आता अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.