नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदान्ना छावा चित्रपटानंतर जोरदार चर्चेत आलेली पाहायला मिळाली आहे. दरम्यान दक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या डेटच्या चर्चांनंतर ही जोडी अनेकांची लोकप्रिय जोडी झाली. त्यांनंतर ते दोघे लग्नबंधनात कधी अडणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.
अलीकडेच दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे स्विकारले आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघांनी 3 ऑक्टोबर रोजी सकाळी घरच्या घरी साखरपुडा उरकल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये दोघेही लग्न करणार आहेत. रश्मिका मंदानाच्या ताज्या साडीच्या फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चा वाढली आणि या खाजगी समारंभाबद्दल चर्चा सुरू झाली.
दरम्यान दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अद्याप साखरपुड्यासंबंधी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. तसेच लग्नाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यांच्या प्रेमसंबंधाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या, दरम्यान या बातमीने त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर या जोडीचा तरुणवर्गामध्ये वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर काही कालांतराने विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी उधाण घेतलं. पाहायला गेलं तर दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल गुप्तता बाळगली असली तरी त्यांच्या कॉफी डेट्ससह गुप्त सुट्ट्यांमध्ये दोघेही एकत्र दिसले आहेत. ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरून ठेवला.
दोघांच्याही कामाबद्दल बोलायचं झाल तर, विजय देवरकोंडा अलीकडेच गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित 'किंगडम' मध्ये पाहायला मिळाला आहे. तसेच राहुल सांकृत्यनच्या पुढील दिग्दर्शनातील, तात्पुरते शीर्षक असलेल्या 'VD14' मध्ये विजय आणि रश्मिका तिसऱ्यांदा एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत. तर दुसरीकडे रश्मिका मंदान्ना लवकरच 'थम्मा' मध्ये एका व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे, जो येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.