स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. विशेषतः ‘वात्सल्य आश्रम’ प्रकरणावर आधारित कोर्टरूम ड्रामामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांनी ज्याच्या निकालाची प्रतीक्षा केली, तो निकाल अखेर मालिकेत जाहीर झाला आहे.
या प्रकरणात न्यायालयाने साक्षी शिखरेला जन्मठेप आणि प्रियाला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे मालिकेतील प्रमुख खलनायिका जेलमध्ये गेल्या असून यामुळे मालिका संपणार का? किंवा मालिकेत सात वर्षांचा लीप येणार का? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
मात्र, या चर्चांवर पडदा टाकत अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केले आहे की मालिका संपत नाही आहे, आणि लीपसुद्धा येणार नाही. तिने अफवांवर विश्वास न ठेवता मालिका नियमितपणे पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. तिने म्हटले आहे की, “फक्त एक प्रकरण संपलं आहे, अजून अनेक गोष्टींचा उलगडा होणे बाकी आहे.”
दरम्यान, मालिकेच्या आजच्या भागात प्रिया शिक्षा ऐकल्यावर पूर्णा आजींसमोर पश्चात्ताप करताना दिसणार आहे. मात्र तिचा खरा चेहरा अजूनही पती अश्विनसमोर आलेला नाही. आता अश्विन तिचा खोटेपणा उघड करतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अभिनेता अमित भानुषाली यांनी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकत सांगितले आहे. आजचा तो दिवस, दोन वर्षानंतर मेहनतीचे फळ आज मिळणार, आज निकाल लागणार, दोन वर्षापासून मधुबन वर झालेला त्रास आज संपणार, या केसचा शेवट आज पाहायला विसरू नका रात्री साडेआठ वाजता स्टार प्रवाहवर असे आवाहन त्याने प्रेक्षकांना केले आहे.