थोडक्यात
झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अखेरचा श्वास घेतला
त्यांचा मृत्यू कसा झाला हे एक गूढच असून यावर अनेक प्रश्न उपस्थित केले
संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना अटक
(Zubeen Garg Death ) झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांचा मृत्यू कसा झाला हे एक गूढच असून यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) गुरुवारी संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांना गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूशी संबंधित तपासात अटक केली आहे. झुबिन यांच्या सिंगापूरमधील प्रवासादरम्यान गोस्वामी हे त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचे समजते.
झुबिन गर्ग यांचा मृत्यू 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये झाला होता. उत्तर-पूर्व भारत महोत्सवासाठी ते तेथे गेले होते. महोत्सव संपल्यानंतर मित्रमंडळीसोबत समुद्रात पोहताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. तातडीने वैद्यकीय मदत मिळूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
गोस्वामी यांना चौकशीसाठी आधी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर SIT ने त्यांना अटक केली. मात्र, त्यांच्या विरोधात नेमके कोणते आरोप आहेत, हे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. माध्यमांतील अहवालानुसार गोस्वामी हे झुबिनचे जवळचे सहकारी होते आणि बँडमध्ये ड्रमर म्हणून काम करत होते.
या तपासाचा भाग म्हणून SIT ने महोत्सव आयोजक श्यामकानू महंता आणि झुबिनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्या निवासस्थानीही शोधमोहीम राबवली. महंता यांच्या घरी केवळ घरकाम करणारे कर्मचारी सापडले, तर शर्मा यांच्या घराचे कुलूप तोडून तपास करण्यात आला. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, झुबिनच्या मृत्यूनंतर शर्मा यांचे कुटुंब दिसलेले नाही.
या प्रकरणाचा तपास विशेष डीजीपी एम.पी. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यीय SIT करत आहे. राज्यात तसेच ईशान्य भारतात या घटनेमुळे तीव्र भावना व्यक्त होत असून, चाहत्यांकडून न्यायासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे.