( Health benefits of Ghee)तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेकजण वरण भातावर तूप टाकून खातात याचा आरोग्याला खूप जास्त फायदा होतो. सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचा उत्साह अवलंबून असतो.
त्यामुळेच आयुर्वेदात सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या दिवसाची सुरुवात तुपापासून केल्याने अनेक फायदे होतात असे अनेकजण सांगतात. पण नक्की तूप खाण्याने शरीराला काय फायदे होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे…
शरीराचं नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन होतं
सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाल्ल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. तूप खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास मल मऊ होतो आणि पोट साफ होते. यामुळे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
बद्धकोष्ठतेपासून आराम
वारंवार पोट साफ न होणं, मळमळ किंवा पोटदुखी यासारख्या समस्या असतील तर तूप फायदेशीर ठरते. तुपातील ब्यूटिरिक ऍसिड आतड्यांच्या आतील थराला मऊ ठेवते आणि सूज कमी करते.
पचनशक्ती मजबूत होते
तूप नियमित खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि अन्नातील पोषक घटक शरीरात नीट शोषले जातात. त्यामुळे दीर्घकाळ पोटाच्या तक्रारी दूर राहतात.
त्वचा होते चमकदार, केस होतात मजबूत
महागड्या स्किन केअर प्रॉडक्टपेक्षा तूप हे नैसर्गिक सौंदर्याचं गुपित मानलं जातं. नियमित तूप खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते, पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात. केसांच्या मुळांना पोषण मिळाल्याने केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
वजन कमी करण्यासाठी तूप उपयोगी ठरू शकते, हे अनेकांना माहीत नसतं. सकाळी गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास चयापचय सुधारतो. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील ओमेगा-3 फॅटी ऍसिडची कमतरता भरून निघते.