गर्भारपणात केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आतल्या गर्भावर होत असतो याची जाणीव भावी आई-वडिलांच्या मनात 24 तास असायला हवी. बाळाचं शारीरिक आरोग्य, मानसिक तसेच भावनिक विकास आणि अध्यात्मिक उन्नती या सर्वांचं मूळ गर्भ संस्कारांच्याद्वारे रोवता येणं शक्य असतं. म्हणूनच गर्भारपणात आहार आचरणाच्या बरोबरीनी योग, संगीत, मंत्र श्रवण, ध्यान, उपासना या सर्वांचा समावेश केलेला असतो.
गर्भाशयात गर्भ तयार होताना कोणत्या महिन्यात कोणता अवयव प्रकर्षानी विकसित होतो हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ,चौथ्या महिन्यात गर्भाचं हृदय प्रकर्षानी विकसित होत असतं. हृदय आणि मांसधातूचा संबंध असल्यामुळे हृदयाच्या सशक्ततेसाठी गर्भवतीनी चौथ्या महिन्यापासून पुढे किमान तीन महिन्यांसाठी मांस पोषक द्रव्यांचं सेवन करणं उपयुक्त असतं.
या दृष्टीने आयुर्वेदात गर्भवतीला चौथ्या महिन्यात घरी बनवलेलं ताजं लोणी खायला सांगितलेला आहे याच्याच बरोबरीने रोज सकाळी आणि संध्याकाळी एक-एक चांगल्या प्रतीचा खजूर, आतली बी काढून टाकून, त्यात घरी बनवलेलं साजूक तूप भरून खाणं हे सुद्धा मांसपोषक, पर्यायानी हृदयाला पोषक असतं.
खजूर रक्तवर्धक असल्याने गर्भवतीचं हिमोग्लोबिन, आर्यन या गोष्टी नीट राहण्यासही मदत मिळते. याशिवाय खजूर आणि तूप हे दोन्ही पदार्थ पोट साफ होण्यास मदत करणारे असल्यामुळे मलावरोधाची प्रवृत्ती दूर होते, ज्याचा पुढे बाळंतपण वेळेवर सुखरूप आणि सामान्य होण्यासही फायदा होतो.
लोणी, खजूर, तूप खाण्यात असलं की जन्मतः बाळाचं वजन चांगलं असतं. तसेच ते बाळसंही छान धरतं असं दिसून येतं. गर्भ संस्कारातले असेच अनुभव सिद्ध उपाय जाणून घेण्यासाठी पाहत राहा.